हर्षनंदन वाघ/बुलडाणा : गत काही दिवसापासून थंडीचा तडाखा वाढल्यामुळे द्राक्ष बागांना फटका बसला असून पश्चिम वर्हाडातील जवळपास १५0 हेक्टरवरील द्राक्षांची फुगवण क्षमता मंदावली आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्ष बागायतदार शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. पश्चिम वर्हाडात काही प्रयोगशिल शेतकरी द्राक्षबागांची लागवड करतात. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १३0 हेक्टर व वाशिम जिल्ह्यात ३0 हेक्टरवर द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे. द्राक्ष बागा जगविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत असून पाणीटंचाईचा काळात बाग जगविणे एक कसरत असते. अशाही परिस्थितीत अनेक शेतकर्यांनी द्राक्षबागा जगविल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून थंडीचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी सामान्य तापमान ७ डिग्रीने खाली घसरत असून काही ठिकाणी तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरत आहे. त्यामुळे द्राक्षवेलींच्या मुळ्े व पेशींची अन्नधारण व वहनक्षमता बंद पडते. त्याचा परिणाम द्राक्षघडापर्यंत होतो. पुरेसा अन्नसाठा फुगवणीच्या स्टेजपर्यंत न गेल्याने द्राक्षमण्यांचा आकार खुंटत आहे. परिपक्व झालेल्या घडांच्या देठांवर, पानांवर कडाक्याच्या थंडीमुळे दवबिंदू थांबून देठ, पाने काळे पडण्याचा धोका वाढला आहे. परिपक्व द्रासघडांतील मणी उन्हाची तीव्रता वाढत गेल्यावर तडकलेले दिसतात. त्यामुळे ग्राहक असे द्राक्ष घेण्यास नकार देतात. परिणामी यावर्षी द्राक्षबाग शेतकर्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसणार आहे. हवामानातील पारा घसरत असल्यामुळे द्राक्षबागांच्या फुगवणीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. बोचरी थंडी वाढल्यामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे.
थंडीचा द्राक्षबागांना फटका
By admin | Published: January 25, 2016 2:08 AM