पुणे : विदर्भात थंडीची तीव्र लाट पसरली असून, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या आसपासच असल्याने राज्यात कमालीचा गारवा पसरला आहे. शहरातील गारठादेखील कायम असून, उलट त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेले काही दिवस शहरासह राज्यातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान घटले आहे. विदर्भातील काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट पसरली आहे. राज्यातील सर्वाधिक कमी तापमान विदर्भातील गोंदियात ६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. नागपूरमध्ये ७.२, अकोला ८, अमरावती ८.४, चंद्रपूर १०, गोंदिया ६.५, यवतमाळ ९.४ असे तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील ही थंडीची लाट कायम राहणार असून, काही ठिकाणी तीव्र थंडी पडेल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागातदेखील सरासरीच्या तुलनेत तापमानात घट झाली असून, उर्वरित राज्यातील किमान तापमानही सरासरीइतकेच आहे.
महाराष्ट्र गारठला, विदर्भात थंडीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 3:28 AM