पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात १ ते दीड अंशाने घट नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी हवामानशास्त्र विभागाने, राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक येथे ११.५ अंश सेल्सियस नोंदवले आहे.मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, महाबळेश्वर या शहरातील थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या शहरातील किमान तापमान १ ते दीड अंशाने घटले आहे. (प्रतिनिधी) महाबळेश्वरपेक्षा पुणे थंड : महाबळेश्वरपेक्षा पुणे, नाशिक, नांदेड, अहमदनगर, परभणी या शहरांतील किमान तापमान एक ते दीड अंशाने घटले आहे. त्यामुळे नागरिक आपल्या शहरातच महाबळेश्वरच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. शुक्रवारी महाबळेश्वर येथील किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले; तर पुणे (१२.९), अहमदनगर (१४.८), परभणी (१५.१), नांदेड (१२), अकोला (१५.६) व नागपूरमध्ये १४.९ तापमान नोंदविण्यात आले.
राज्यात थंडीचा कडाका वाढला
By admin | Published: November 21, 2015 2:05 AM