मुंबई - मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला पुढील २४ तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.
राज्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला आहे. प्रकाश मार्कंड असे या नागरिकाचे नाव आहे. २७ नोव्हेंबरला ते माना येथील प्रवासी निवाऱ्यात आश्रय घेण्यासाठी थांबले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
पुढील दोन तीन दिवस राज्यात गारठा कायम राहणार आहे. यास बोचरी थंडी म्हणता येणार नाही. मात्र यंदा असे वातावरण लवकर तयार झाले असून, पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. - कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, हवामान विभाग, पुणे
कुठे किती आहे थंडी?
अहिल्यानगर ९.४ नाशिक १०.६परभणी ११.६जळगाव ११.७नागपूर ११.७महाबळेश्वर ११.८गोंदिया ११.९सातारा १२ छत्रपती संभाजीनगर १२.२नंदुरबार १२.८ मालेगाव १२.८ वर्धा १३.५बुलढाणा १३.६अकोला १३.६अमरावती १४.१सांगली १४.४सोलापूर १५.२कोल्हापूर १५.५अलिबाग १५.८ मुंबई १७.६ रत्नागिरी २०.५पालघर २२.४