गेल्या काही दिवसांपासून हाडे गोठवणारी थंडी आज अचानक बेपत्ता झाली आहे. याचबरोबर राज्यात पुढील दोन तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असून यामुळे काजू, आंबा मोहोराला फटका बसणार आहे.
३ व ४ डिसेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तस इतर ठिकाणी मध्यम, हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ३ तारखेला कोल्हापूर, सिंधुदूर्ग तर ४ तारखेला या दोन जिल्ह्यांसह सातारा, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर पुणे, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर व नांदेड जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पडलेल्या थंडीचा गारठा संपणार आहे. तापमान वाढायला सुरुवात होणार असून ढगाळ वातावरणामुळे उकाडाही काही प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.