पुणे : विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून सर्व राज्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील २ दिवस तापमानात हळू हळू वाढ होऊ लागणार असून दिवाळीत थंडीचा असर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात बुधवारी सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ९.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, सध्या उत्तर पूर्वेकडून हवा दक्षिणेच्या दिशेने वाहत असल्याने उत्तरेकडील थंड वारे राज्यात येत असल्याने हवामानात मोठी घट झाली आहे. ही परिस्थिती थंड हवेच्या लाटेच्या जवळपास जाणारी आहे.परभणीत सरासरीपेक्षा ७.५ अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे. त्याचबरोबर सोलापूरला ५.८, गोंदिया येथे ६ अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे. १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात १२ ते १४ अंश सेल्सिअस, कोकण १८ ते २० अंश सेल्सिअस, मराठवाडा १३ ते १४ अंश सेल्सिअस आणि विदर्भात १२ ते १४ अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारी १६ नोव्हेंबरला दक्षिण पूर्व भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आर्द्रता वाढून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे......
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)पुणे १०.६, लोहगाव १२.४, जळगाव ११.६, कोल्हापूर १५.२, महाबळेश्वर १२.२, मालेगाव १२.६, नाशिक १०.६, सांगली १३.३, सातारा १२.६, सोलापूर १२.९, मुंबई २२, सांताक्रुझ १९.४, रत्नागिरी १७.३, पणजी १९.३, डहाणु १९, औरंगाबाद १२, परभणी ९.९, नांदेड १३.५, बीड १५.६, अकोला १२.४, अमरावती १२.७, बुलढाणा १३.२, ब्रम्हपुरी १४.५, चंद्रपूर ११.८, गोंदिया ११.४, नागपूर १२.२, वशिम १२, वर्धा १३.