पुणे : रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी देशात भव्य प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.पुणे शहरात ससून सर्वोपचार रुग्णालय, शासकीय तंत्रनिकेतन, महापालिका भवन, येरवडा मनोरुग्णालय, धनकवडी परिसर, कोथरूड परिसर, शिवाजीनगर पुणे जिल्हा न्यायालय या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात १० हजार स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान ५५० टन कचरा गोळा करण्यात आला, अशी माहिती धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छ भारत’ अभियानची घोषणा केली होती. त्याला अनुसरून राज्यपालांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छ भारत अभियानाचे अग्रदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुणे शहरात सुमारे १० हजार, तर पुणे जिल्ह्यात सुमारे ३० हजार स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. हे अभियान महाराष्ट्रासह विविध राज्यातील १४८ शहरांमध्ये राबविण्यात आले. सुमारे १,४३४ सरकारी कार्यालये, ११५ रेल्वे स्थानके व सुमारे २,७२० किलोमीटर लांबीचे शहरातील रस्ते, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, बस स्थानके, रुग्णालये येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरवण्यात आले होते.(प्रतिनिधी)>कचऱ्याचे वर्गीकरण कराडॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, ‘‘कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीबरोबरच टायफॉईड, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे संसर्गजन्य आजार पसरतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला आणि सरकारला मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. अस्वच्छ वातावरणामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण होते. हे सर्व टाळण्यासाठी जमा होणारा कचरा ठरवून दिलेल्या जागी नेऊन टाकला पाहिजे. ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण केले पाहिजे. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे. आपण आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपले शहर, गाव परिसर आणि देश स्वच्छ राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
स्वच्छता मोहिमेत ५५० टन कचरा गोळा
By admin | Published: March 02, 2017 1:10 AM