नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारला हटवण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मोदी आणि भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची महत्त्वाची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर घणाघाती टीका केली आहे. सोळा केले गोळा आणि स्वत:चा करून घेतला पालापाचोळा, आहे असा टोला लगावला आहे.
आशिष शेलार यांनी मराठीतील अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील डोहाळे जेवणाच्या प्रसंगाचं उदाहरण दिलं आहे. आशिष शेलाल म्हणाले की, मराठीत गाजलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ते दृश्य सर्वांना माहितच असेल. स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरू होती "न होणाऱ्या" बाळासाठी खोटी खोटी सजावट करण्यात आली होती. सत्य सगळ्यांना माहिती असतानाही केवळ आपले "घर' टिकवता यावे म्हणून धडपड सुरू होती. नटूनथटून बाकी मित्र नाचत आहेत. "कोणी तरी येणार येणार गं..पाहुणा घरी येणारं गं’’, हे गाणं गात आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून उबाठा गटाकडून मुंबईत तथाकथित इंडिया नावाच्या आघाडीच्या स्वागताची जी लगबग सुरु आहे ती पाहताना वरील दृश्य पटकन आठवते! काय ती होर्डिंग लावत आहेत. केवढे ते फोटो, कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही. भाजपा सोबत होते तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते. आता सोळा केले गोळा आणि स्वत:च स्वत:चा करून घेतला पालापाचोळा, अशी यांची अवस्था झाली आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.