अहमदनगर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याने थकविलेल्या उसाच्या पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या जमावाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच रॉकेल अंगावर ओतून घेत, सामूहिकरित्या आत्मदहनाचा प्रयत्न केला़ मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील दुपारच्या बैठकीतही निर्णय न झाल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रतिनिधींना जबरदस्तीने उपोषणस्थळी बसवून ठेवल्याने, आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे़साईकृपा साखर कारखान्याकडून गतवर्षीच्या गळीत हंगामातील उसाचे थकीत पेमेंट मिळावे, या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील नायगव्हाण येथील ६० ते ७० शेतकऱ्यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले़ शेतकऱ्यांच्या उपोषणाचा गुरुवारी दुसरा दिवस होता़ उपोषणाची दखल घेतली न गेल्याने, संतप्त शेतकरी गुरुवारी सकाळी आक्रमक झाले व त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: November 20, 2015 1:14 AM