लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: येत्या शैक्षणिक वर्षात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहेत. तसे नियोजनही शिक्षण विभागाने केले आहे; परंतु यात काही शिकवणी वर्ग संचालक आणि संस्थाचालक खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश होऊच नये, यासाठी शिक्षण संचालकांपर्यंत लॉबिंग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दहावीचा निकाल लागल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. प्रवेश देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून आकर्षित प्रवेश अर्ज छापून २00 ते ३00 रुपये दराने त्याची विक्री केल्या जाते. या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालयांना लाखो रुपये प्राप्त होतात. तसेच अनेक शिकवणी वर्ग संचालकांनी स्वत:ची कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली आहे. त्यांच्या शिकवणी वर्गातील मुलांनी त्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश घ्यावा. यासाठी प्रयत्न करून डबल कमाई करतात; परंतु येत्या शैक्षणिक वर्षात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने दोन महिन्यांपासून नियोजन सुरू केले. त्यासाठी शिक्षण संचालकांकडे प्रस्तावसुद्धा पाठविण्यात आला. केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार म्हटल्यावर शिकवणी वर्ग संचालकांसोबतच संस्थाचालकांचे धाबे दणाणले. केंद्रीय प्रवेश पद्धतीमुळे प्रवेशपत्र विक्री व डोनेशनच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईला आळा बसू शकतो आणि शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार नाही, अशी भीती काही शिकवणी वर्ग संचालकांना वाटू लागली. त्यामुळे अकोल्यातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होऊच नये यासाठी काही शिकवणी वर्ग संचालक आणि संस्थाचालकांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण संचालकांपर्यंत लॉबिंग सुरू केली. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्तावाला अद्यापपर्यंत मंजुरी मिळू शकलेली नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. दहावी परीक्षा निकाल तोंडावर असतानाही शिक्षण संचालकांनी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिली. यामागे शिकवणी वर्ग संचालक आणि शिक्षण संस्थाचालकांचे सुरू असलेले प्रयत्न कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
केंद्रीय प्रवेश नाकारण्यासाठी महाविद्यालयांची खेळी!
By admin | Published: June 07, 2017 1:20 AM