ऑनलाइन लोकमतबारामती, दि. १६ - आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही माझे लाड केले जात नाही. या नैराश्यातून बारामती एमआयडीसी परीसरातील सूर्यनगरी येथे मानसिक नैराश्यातून एका महाविद्यालयीन युवतीने रिव्हॉल्व्हर ने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि १५) रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बारामती ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या उर्फ सायली मानसिंग बळी (वय १७) असे या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. ती सूर्यनगरी येथील सुधांगण बिल्डींगमध्ये भाऊ आणि आईसमवेत वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून घेत तिने आत्महत्या केली. याबाबत तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी सायली तिची आई व भावासह बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आलेले होते. ती ११ वी उत्तीर्ण झालीआहे. यापूर्वी ती पंजाबमध्ये शिकायला होती.
आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही माझे लाड केले जात नाही. या नैराश्यातून तिने हे कृत्य केल्याचे काळे यांनी नमूद केले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत ही बाब उघड झाली आहे. सायली हिचे वडील सैन्यात कार्यरत असून ते कर्तव्य बजावत आहेत. ते सिक्कीम येथे हवालदार पदावर कार्यरत आहेत. या घटनेनंतर ते बारामतीला येण्यासाठी निघाले आहेत. सायली हिने आत्महत्या करण्यासाठी वापरलेले रिव्हॉल्व्हर विनापरवाना आहे. अवैध रिव्हॉल्व्हर सायलीकडे कोठून आले, याबाबत तिच्या कुटुंबियांकडेच तपास करावा लागणार आहे.त्यानंतरच याबाबत माहिती मिळू शकणार आहे.
पोलीस तपास सुरू आहे.त्यामध्ये इतर माहिती समजणार आहे,असे काळे यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सायली बळी हिने घरात असलेल्या गावठी कट्ट्यातून कपाळाच्या मध्यभागी एक गोळी मारुन घेतली. ही गोळी तिच्या कपाळातून आरपार जाऊन बाहेर पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.तिची आई भारती यांनी तिला उपचारासाठी रुई रुग्णालयात नेले.मात्र, तत्पूर्वीच सायलीचा मृत्यू झाला होता.