लोकमत न्यूज नेटवर्क
लोनाड : महाविद्यालयीन युवक-युवती राजकारणाकडे सकारात्मक बदल घडविण्यासाठी अपेक्षेने पाहत असून, त्यांच्या मनाला साद घालण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करणार आहे. त्यामुळे मला चर्चेदरम्यान महाविद्यालयीन युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा दावा मनसे विद्यार्थी सेनाप्रमुख अमित ठाकरे यांनी गुरुवारी केला.
ठाकरे मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ठाणे जिल्ह्यातील दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी भिवंडी येथील शांग्रीला रिसॉर्ट येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून केला. त्यानंतर ते पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते.
याप्रसंगी मनसे उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, उर्मिला तांबे, भिवंडी लोकसभा जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी, मनसे विद्यार्थी ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख संतोष साळवी, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी आदी उपस्थित होते. वाढती फी व आरक्षणामुळे महाविद्यालयांत प्रवेश मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे, म्हणून सर्व महाविद्यालयांत मनसे विद्यार्थी सेनेची स्थापना करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे.
‘ग्रामीण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणार’
वासिंद : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मनविसे पाठबळ देणार असल्याची ग्वाही मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली. मनविसेच्या महासंपर्क पुनर्बांधणी दौऱ्यानिमित्त ठाकरे गुरुवारी शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. वाढलेली प्रवेश फी, शाळा तसेच कॉलेज व्यवस्थापन यांची मनमानी आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आदी समस्या सोडविण्यासाठी मनविसेचे पाठबळ असणार असल्याचे ते म्हणाले.