लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व महाविद्यालये आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवून परीक्षाही ऑनलाईनच घेतल्या जाणार आहेत. याशिवाय शाळांमधील बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने औरंगाबाद शहर, रायगड जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. नागपूर शहर आणि हिंगणा, कामठी, कळमेश्वर सावनेर तालुक्यांमधील शाळाही बंद राहणार आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विभागाचे प्रधान सचिव, तंत्रशिक्षण संचालक, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हावार कोविड परिस्थिती काय आहे? किती परीक्षा झाल्या आहेत आणि किती परीक्षा बाकी आहेत? वसतिगृहांची काय परिस्थिती आहे? या सगळ्या बाबींची माहिती घेऊन आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सामंत यांनी जाहीर केला.
ऑनलाईन शिक्षणादरम्यान विजेची समस्या, कोरोना संदर्भातील अडचणी, नेटवर्कची अडचण अशा कारणांमुळे जर विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकले नाहीत तर त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची खबरदारी आणि जबाबदारी विद्यापीठांची असेल, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गोंडवाना, नांदेड, जळगावसारख्या ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने तेथे कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधत स्थानिक पातळीवर नियोजन करून ऑफलाईन परीक्षा कशा घेता येतील याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना सामंत यांनी दिल्या आहेत.
वसतिगृहांना लागणार टाळे
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना आणि पुरेसा वेळ देऊन वसतिगृहे बंद करण्याच्या सूचनाही दिल्या असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जे विद्यार्थी परदेशातून शिक्षण, संशोधनासाठी आले आहेत, त्यांची पूर्ण काळजी घेऊन त्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी मिळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना महाविद्यालये व विद्यापीठांना दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या काही परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे कला शिक्षण संचालनालयाला त्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री