मुंबई : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकली जात आहेत. १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असली तरी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होतील, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्ससोबतच्या चर्चेनंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मंत्री सामंत म्हणाले की, अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याच्या मन:स्थितीत आहोत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करावी, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणणे आहे. याच कालावधीत दिवाळी असल्याने शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी सणानंतरच महाविद्यालये सुरू करता येतील. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेतला जाईल.
विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अजूनही कोविडची भीती आहे. त्यामुळे उपस्थितीची सक्ती केली जाणार नाही. शिवाय, हमीपत्राचीही आवश्यकता नाही. सर्व बाबींचा विचार करून निर्णय केला जाईल. राज्यात कोरोनाची स्थिती कमी झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, तिथे महाविद्यालये सुरू करायला हरकत नाही. मात्र, मुख्यमंत्रीच याबद्दलचा निर्णय घेतील, असेही सामंत म्हणाले.
३०७४ प्राध्यापकांच्या जागा राज्यात रिक्त
- राज्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी प्राध्यापक भरतीची फाईल अर्थ विभागाकडे जाईल. राज्यात ३०७४ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.
- सीएचबी तत्त्वावर प्राध्यापकांनाही चांगले मानधन मिळेल, याचाही विचार करण्यात येत असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.