राजीव मुळ्ये ल्ल बेळगाव, (बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी) - बेळगावात मराठी नाट्यसंमेलन आयोजित करीत असताना कर्नाटकच्या पोलिसांनी लादलेल्या जाचक अटी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी केली. शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ शब्द का गिळला, असा सवालही त्यांनी या वेळी केला.९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे सूप रविवारी सायंकाळी वाजले. समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना रावते यांनी अपेक्षेप्रमाणे मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला. मराठी माणसाचा हुंकार थांबविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला असून, मराठी माणूस कधीच झुकणार नाही, असे ते म्हणाले. संमेलन नगरीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘कलावंतांच्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. हे शरद पवार यांना संमेलनाच्या उद्घाटनावेळी आठवले; सत्ता होती तेव्हा त्यांनी काय केले? स्वत:चे पाकीट शाबूत ठेवून दुसऱ्याच्या खिशात हात घालण्याची सवय असली की असेच होते,’’ असा टोलाही त्यांनी लगावला.
अभिव्यक्तीची केली पायमल्ली
By admin | Published: February 09, 2015 6:12 AM