सातारा : सीमा ओलांडून पाकिस्तानातून काश्मीरमध्ये घुसलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत भारतीय लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्याने सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी आणि आरे या दोन गावांवर मंगळवारी शोककळा पसरली. १६ वर्षांपूर्वीच्या कारगिल युद्धानंतर गावातील दुसऱ्या सुपुत्राने भारतमातेच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती दिल्याने शोकाकूल अवस्थेतही पोगरवाडीच्या ग्रामस्थांचे ऊर अभिमानाने भरून आले.कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी व मुले काश्मीरमधील उधमपूरमध्येच वास्तव्यास असून, संतोष यांच्या पार्थिवासोबतच ते सातारा येथे येणार आहेत. पार्थिव उद्या बुधवारी रात्री मुंबईपर्यंत विमानाने आणण्यात येईल. त्यानंतर वाहनाने ते साताऱ्याला आणण्यात येईल. बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी पहाटे पार्थिव साताऱ्यात पोहोचण्याची शक्यता आहे.कर्नल संतोष महाडिक हे मूळचे सातारा-सज्जनगड रस्त्यावरील पोगरवाडी गावचे. त्यांचे मूळ नाव संतोष मधुकर घोरपडे असून, आरे (ता. सातारा) येथे वास्तव्यास असलेल्या मावशीकडे ते दत्तक गेले होते. त्यांच्या वडिलांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यांचा भाऊ दूध व्यवसाय करतो, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर ते सातारच्या सैनिक स्कूलमध्ये शिकले. १९९४ मध्ये बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झाल्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते लष्करात भरती झाले. ४१ राष्ट्रीय रायफल्समध्ये ते कर्नलपदापर्यंत पोहोचले. (प्रतिनिधी)अंकुश घोरपडे यांचे स्मरण : कर्नल संतोष महाडिक मूळचे पोगरवाडीचे असल्याने त्यांच्या हौतात्म्यानंतर ग्रामस्थांना जवान अंकुश घोरपडे यांच्या हौतात्म्याचे स्मरण झाले. १९९९ च्या कारगिल युद्धात अंकुश घोरपडे शहीद झाले होते. त्यानंतर याच गावचे आणि मूळ आडनाव घोरपडेच असलेले कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्याने, पोगरवाडीने आणखी एक उमदा जवान गमावला आहे. स्वत: पुढे राहून नेतृत्व करणाऱ्या व वेळ पडल्यास देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे न पाहणाऱ्या कर्नल महाडिक यांच्यासारख्या तरुण अधिकाऱ्यांचा देशाला अभिमान आहे.-मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्रीधडाडीने नेतृत्व करून दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात स्वप्राणांची सर्वोच्च आहुती देण्यासही न कचरणाऱ्या संतोषसारख्या अधिकाऱ्यांचे आमच्यावर फार मोठे ऋण आहे.-ले. जनरल डी. एस. हुडा, कमांडिग आॅफिसर, उत्तर कमांड
कर्नल महाडिक यांच्या हौतात्म्याने पोगरवाडीवर शोककळा
By admin | Published: November 18, 2015 2:39 AM