सातारा : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव बुधवारी रात्री उशिरा साताऱ्यात दाखल होताच त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी अक्षरश: टाहो फोडला. पोगरवाडी या जन्मगावी गुरुवारी सकाळी महाडिक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कर्नल महाडिक (घोरपडे) हे कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांची शोधमोहीम सुरू असताना शहीद झाल्याचे वृत्त समजल्यापासूनच सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पार्थिव पुण्यातून निघण्यास रात्रीचे आठ वाजले. कर्नल संतोष यांना दत्तक घेणारे त्यांचे १०४ वर्षांचे आजोबा हे वृत्त ऐकून सुन्न झाले होते. त्यानंतर सुमारे दोन तास नागरिकांसाठी पार्थिव त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळी लवकर पार्थिव पोगरवाडीला नेण्यात येईल. तेथे लष्करी जवान आणि पोलिसांनी सलामी दिल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
लष्कराची आदरांजलीश्रीनगर : बादामी बाग छावणीत आयोजित केलेल्या शोकसभेत कर्नल संतोष महाडिक यांना बुधवारी येथे लष्कराच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी कर्नल महाडिक यांच्या शौर्य आणि बलिदानाला सलाम केला. नॉर्दन कमांडर लेप्ट. जन डी. एस. हुडा, सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी तसेच जम्मू-काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शवपेटीसमोर पुष्पचक्र अर्पण केले.