ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 7 : शांतिनगर पोलीस ठाण्यात चालणाऱ्या पत्त्याच्या डावाची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासंबंधाने पोलीस अधिकाऱ्यांकडून क्लीपसंदर्भातील वृत्ताला दुजोरा न मिळाल्याने उलटसुलट चर्चेलाही उधाण आले आहे.गुन्हेगार आणि अवैध धंद्यांची बजबजपुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लकडगंज पोलीस ठाण्याचे विभाजन करून वर्षभरापूर्वी शांतिनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांची भरमार आहे. हप्तेखोरीसाठी चटावलेले ठाण्यातील काही पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारीही कुख्यात आहेत. त्यामुळे हे पोलीस ठाणे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. या पार्श्वभूमीवर, पोलीस ठाण्यात चक्क पत्त्यांचा डाव रंगतो, अशी काही दिवसांपासून चर्चाही होती. मात्र त्यासंबंधाचे पुरावे नसल्याने कुणी या चर्चेवर विश्वास ठेवत नव्हते. परंतु शांतिनगर पोलीस ठाण्यात पत्त्यांचा डाव सुरू असल्याची क्लीप रविवारी व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये ठाण्यातील चार कर्मचारी ताशपत्त्यावर डाव खेळताना दिसतात. या क्लीपमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. यासंबंधाने सविस्तर माहितीसाठी लोकमतने वरिष्ठांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
जुगार नव्हे विरंगुळा यासंबंधाने पोलीस ठाण्यातील दुसऱ्या (जुगाराशी संबंध नसलेल्या) अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी पत्ते खेळले जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, येथे पैशाची बाजी लावली जात नाही. तणाव हलका करण्यासाठी मनोरंजनाचे दुसरे साधन नसल्याने काही जण बसल्या बसल्या ताशपत्ते खेळतात. हा जुगार नव्हे तर विरंगुळा असल्याचे त्यांनी सांगितले.