पुणे : साहित्य आणि नाटक या दोन्हींचा जवळचा संबंध आहे. रंगकर्मींकडून शब्दांची कसर कलाकृतीमधून व्यक्त होते, तर साहित्याची साहित्यनिर्मितीमधून. भारतातातील अनेक रंगभूमींमध्ये मराठी रंगभूमीचे अद्वितीय असे योगदान आहे. ‘रंगकर्मी’ हे मराठी संस्कृतीचे वाहक असून, रंगभूमीच्या सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे, असे साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या ३६व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित विविध पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. रंगभूमीच्या प्रदीर्घ सेवेबद्दल भार्गवराव आचरेकर स्मृती पुरस्कार श्रीराम रानडे यांना, तर अखंड नाट्यसेवा पुरस्कार सदाशिव गाडेकर यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय विद्यानंद देशपांडे यांना संगीत नाट्य प्र. श्री. दिवाकर स्मृती, केशवी मंगेश अडसूळ यांना रमाबाई गडकरी स्मृती, परिषद सेवा कार्यकर्ता पुरस्कार संजय देशपांडे यांना, तर कै. आशुतोष नेर्लेकर यांना यशवंत दत्त, भगवान सूर्यवंशी यांना कै. राम नगरकर स्मृती, जयमाला इनामदार यांना वसंत शिंदे स्मृती पुरस्कार देण्यात आला. परिषदेचे पुणे शाखाध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष अविनाश देशमुख, दादा पासलकर, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, मेघराजराजे भोसले, मकरंद टिल्लू, निकिता मोघे उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘जगभरात काय चालले आहे, याचे प्रतिबिंब रंगभूमीवर उमटते. पण आज त्याला काही प्रमाणात ओहोटी लागली आहे. हा काळाचा महिमा आहे.’’ सांगीतिक नृत्यविष्कार आणि विनोदी स्किट्सने हा पुरस्कार सोहळा चांगलाच रंगला. (प्रतिनिधी)४ग्रामीण भागात नाटक पोहोचावे आणि तिथल्या लोकांना कलाकारांशी संवाद साधता यावा, यासाठी नाट्य परिषदेतर्फे ‘कलाकार आणि नाट्य परिषद आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम वर्षभरात राबविणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी दिली. रसिकांची दाद तृप्तीची भावना४रसिकांकडून दाद मिळणे ही खरंतर कठीण गोष्ट असते. त्यामुळे ही दाद मिळणे ही प्रत्येक कलाकारासाठी तृप्ती देणारी गोष्ट असल्याची भावना श्रीराम रानडे यांनी व्यक्त केली.
मराठी संस्कृतीचे रंगकर्मी वाहक
By admin | Published: May 26, 2015 1:26 AM