अतुल कुलकर्णी -
मा. चंद्रकांतदादा,नमस्कार,सगळ्यात पहिले आपलं अभिनंदन. ज्या जिद्दीनं आणि एकदिलानं आपण कोल्हापूरची पोटनिवडणूक लढवली, त्यासाठी आपण अभिनंदनास पात्र आहात. कोण काय बोललं त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही ज्या पद्धतीने निकालाचे विश्लेषण केलं ते ऐकून मन भरून आलं. गरीब असो की श्रीमंत... प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे. हीच तर आपल्या लोकशाहीची ब्युटी आहे. असं ही आपण म्हणालात, कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने दडपशाही, दंडुकेशाहीचा वापर केला. पोलिसी बळाचा वापर केला. त्यामुळे त्यावर कशी मात केली हे आपण सांगितलं. आपले हे विचार खरं तर देशातल्या सगळ्या नेत्यांनी ऐकले पाहिजेत... आचरणात आणले पाहिजेत... महाविकास आघाडीच्या नेत्यांना बहुतेक कावीळ झाली असावी. त्यांना सगळंच चुकीचं दिसतं. जे लोक चुकीचं वागतील, भ्रष्टाचार करतील, त्यांच्यामागे तर सीबीआय लागणारच... मात्र तेच आपल्यावर दडपशाही, दंडुकेशाहीचा आरोप करतात. देशात अघोषित हुकूमशाही आहे असंही बोलतात... पण आपण आज लोकशाहीची ब्युटी ज्या पद्धतीने समजावून सांगितली ते ऐकून खूप छान वाटलं... शिवसेना नेते संजय राऊत तर हल्ली न्यायव्यवस्थेलाही सोडत नाहीत. त्यांना न्याय मिळत नाही आणि आपल्या लोकांना न्याय मिळतो असा त्यांचा दावा आहे. पण एक सांगा दादा, ज्या पद्धतीने अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत किरीट सोमय्या अज्ञातवासात गेले, तसे अज्ञातवासात जाण्यासाठी यांना कोणी रोखले होते..? पण यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं... न्यायालयात जाऊन नीट लढायला यांना काय हरकत आहे. पण दादा आपले माजी मंत्री आमदार संजय कुटे असं का बोलले हो...? महाराष्ट्र सरकारने पोलीस यंत्रणेचा कितीही वापर केला तरी न्यायालय आमच्यासाठी आहे... तेथून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात... असं विधान त्यांनी केलं... टीका सुरू झाली की लगेच माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असंही सांगून टाकलं... खरं तर त्यांनी असं वक्तव्य करायलाच नको होतं... आणि केल्यानंतर यू-टर्न घ्यायला नको होता... असं नाही वाटत का आपल्याला... एकीकडे आपण नियमानुसार, कायद्यावर बोट ठेवून सगळी कामं करत असताना संजय कुटे यांच्या हे असं बोलण्यामुळे आपलीच अडचण होत नाही का दादा... त्यांना जरा तुमच्या पद्धतीने ठणकावून सांगा बर तुम्ही...एक पोटनिवडणुकीचा निकाल काय आला, सगळेजण दादा तुम्हाला हिमालयात पाठवायला निघाले...! तुम्ही बोललात काय... लोकांनी ऐकलं काय... आणि आता तुमच्यावर टीका करतायेत काय...? कशाचा कशाला ताळमेळ नाही... त्या बंटी पाटलांच्या लोकांनी तर ‘हिमालय की गोद में..’ असे पोस्टर लावले म्हणे... यांच्याकडे काही क्रिएटीव्हीटच उरलेली नाही... बंटी पाटील स्वत: सुध्दा कसे त्या पुष्पा सारखं दिसत आहेत... नजर लावून पाहिलं तर पुष्पा... झुकेगा नही साला... असं म्हणतील की काय असं वाटतं... पण ते जाऊ द्या... दादा, जयंतराव पाटील तर बोलण्यात भलतेच कुचकट... ते म्हणाले, चंद्रकांत दादा हिमालयात जाणार असतील तर मी पण त्यांच्यासोबत जातो... दादा तुम्ही खरंच जा बरं हिमालयात... येतात का बघू आहे तुमच्यासोबत... आहे का हिम्मत त्यांच्यात... आणि एक आतली बातमी सांगू का दादा, जर तुम्ही हिमालयात जयंतरावांना घेऊन जाणार असाल तर अजित दादा तुम्हाला स्पेशल फ्लाईट देतील... जयंतरावला तिकडेच कुठेतरी सोडून या म्हणून सांगतील... ही फार बेस्ट आयडिया होईल... बघा जमवता आलं तर...?जाता जाता एक विचारू का दादा, आपल्या भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या काही हालचाली आपल्या पक्षात चालू आहे का..? चॅनलवाले सारखं त्याच बातम्या दाखवत सुटले आहेत... जर का जास्ती बोलू लागले ना हे चॅनलवाले, तर सरळ बदलून टाकता येईल का त्यांना... पण दादा, या विरोधकांचं फार मनावर घेऊ नका... ही अशी टीका होतच असते... आपण आपलं काम करत जायचं... देवेंद्रभाऊ नाराज नाहीत ना तेवढं बघून घ्या... आपलाचबाबूराव