अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई प्रिय, संजय राऊत नमस्कार, मोकळ्या हवेत श्वास घेताना तुम्हाला नक्कीच आनंद होत असेल. एवढे दिवस तुमची कमतरता जाणवत होती. आता तुम्ही आलात, त्यामुळे पुन्हा सकाळच्या पत्रकार परिषदा सुरू होतील. रोज नव्या बातम्या मिळतील, या आशेने सगळे बसले असताना, तुम्ही नवाच बॉम्ब टाकला. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी फुटेल, असे आपण म्हणालात आणि अनेकांच्या डोळ्यात दिवसा तारे चमकले.
राहुल गांधी यांनी सावरकरांचा मुद्दा काढण्याची गरज नव्हती. ते आमचे श्रद्धास्थान आहेत, असेही आपण सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी भारत जोडो यात्रेतून सावरकरांचा मुद्दा बाद झाला. तुमची आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी कामी आली की नाही, हे कळत नाही. मात्र, शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जर महाविकास आघाडीतून बाहेरच पडायचे होते, तर एवढे दिवस का लावले? आधीच जर हे केले असते, तर आम्ही ४० जणांनी वेगळा विचार कशाला केला असता..? विनाकारण आमच्याही डोक्याला मनस्ताप का दिला...? हे तुम्हाला विचारण्यासाठी गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली काही मंडळी येणार आहेत, अशीही माहिती आहे. आपण तिकडे जाण्याची घाई तर केली नाही का, असा प्रश्न आता कीर्तिकरांना पडल्याचे समजते. काही जणांनी थेट रात्री उशिरा शिंदे साहेबांची भेट घेऊन हे काय आता नवीनच...? अशी विचारणा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेही मुख्यमंत्री उशिरापर्यंत जागे असतात. त्यामुळे त्यांनी उशिरा बंगल्यावर आलेल्यांचे ‘पूर्ण समाधान’ करून पाठविल्याचे कळते.
इकडे उ.बा.ठा. गटात अस्वस्थता पसरली आहे. ४० जण एकदम निघून गेल्यामुळे ज्यांना नव्या जबाबदाऱ्या मिळाल्या, नवीन पदे मिळाली, त्या सगळ्यांच्या पोटात गोळा आला आहे. जर का तुम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलात आणि ते चाळीस जण व तुम्ही पुन्हा एकत्र यायचे ठरविले, तर आपल्याला मिळालेल्या नव्या जबाबदाऱ्यांचे काय होणार, या प्रश्नाने त्यांची झोप उडाली आहे. भास्कर जाधव यांनी तर रात्री लगेच मातोश्रीवर फोन करून उद्धवजींना उठविले. आता हे असे काही करू नका, असे सांगितल्याचे तिथल्या ऑपरेटरचे म्हणणे आहे. जर हे खरे असेल, तर तुम्ही पुन्हा भूमिका बदलणार का...? राहुल गांधी यांनी या विषयावर कोणतेही भाष्य करायचे टाळले आहे. तुम्हीही तसेच करणार का...? आज ज्या पद्धतीने आपल्या मुखपत्रात भारत जोडोचे कव्हरेज झाले ते पाहता, आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा विचार सोडलेला दिसतो, असा दिलासादायक सूर शिशिर शिंदे यांनी लावल्याचे दिसले.
जर तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलात, तर तुम्ही कोणासोबत जाणार...? तुम्ही एकटे लढणार की, ‘या चिमण्यांनो परत फिरा’ या गाण्याची आठवण करून देणार...? जर त्या चिमण्या परत आल्या, तर त्यांना राहायला खोके देणार की खोपा देणार...? महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर तुम्हीच आमच्याकडे या, आम्हीच तुम्हाला खोपा देतो, असे जर तिकडून निमंत्रण आले तर तिकडे जाणार का...? या सगळ्या प्रकारात घराघरात जी भांडणे लागली आहेत. एकाच घरात एक जण बाळासाहेबांच्या शिवसेनेत, तर दुसरा उ.बा.ठा.मध्ये... अशा स्थितीत एकत्र कसे येणार..? एकमेकांच्या परतीचे दोर अजून किल्ल्यावर शाबूत आहेत का... की, तेही कापून टाकले...? प्रश्न खूप आहेत. तुम्ही एक वाक्य बोललात. मात्र, त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक कधी आणि कशी होणार...? हा महाराष्ट्राला पडलेला एक वेगळाच प्रश्न आहे.
बिचारे राहुल गांधी...! त्यांनी भारत जोडो यात्रा काढली. द्वेष केल्याने देशाचे भले होणार नाही, असे म्हणत, ‘नफरत छोडो’चा नारा दिला. ते सगळं पाण्यात जाईल की काय, अशी भीती आता काँग्रेस नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे राहुल गांधी गेल्यानंतर राज्यातल्या राज्यात त्यांनी पुन्हा एक यात्रा काढायचे नियोजन केले आहे. अशा यात्रा जत्रा सतत झाल्या पाहिजेत, जेणेकरून कार्यकर्त्यांना काम मिळतं. हातात चार पैसे येतात. आजूबाजूचा व्यापार उदीम चालतो. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. लॉकडाऊनमध्ये ज्यांनी ज्यांनी ‘मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी’ म्हणत अर्थव्यवस्थेला तसाही हातभार लावला होताच. आता या यात्रा जत्रांमुळे अर्थव्यवस्था आणखी चांगली होईल आणि मोदीजींच्या स्वप्नातील कितीतरी ट्रिलियनचा देश बनविण्याचं स्वप्न साकार होईल... असे तुम्हाला वाटत नाही का..? असो तब्येतीची काळजी घ्या... - तुमचाच बाबूराव