नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती जवळपास निश्चित झाली आहे. त्यानुसार मुंबई, अहमदनगर आणि अकोला-बुलडाणा-वाशीम या तीन जागा शिवसेना लढेल तर अन्य पाच जागा भाजपा लढविणार आहे. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सात जागांवर एकमत झाले असले तरी अकोला-बुलडाणा-वाशिमच्या जागेचा तिढा कायम आहे. उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे भेट घेतली आणि युतीवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. युतीमध्ये भाजपा नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, धुळे-नंदुरबार या चार जागा लढवेल आणि मुंबईतील दुसरी जागा लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपुरात स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या इच्छेला लगाम बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची आज येथे बैठक झाली. तीत, मुंबई, नागपूर, धुळे-नंदुरबार, कोल्हापूर या चार जागा काँग्रेसने तर अहमदनगर, सोलापूर या जागा राष्ट्रवादीने लढण्याचे ठरले. मुंबईतील दोन जागांपैकी एकच जागा आघाडीमध्ये काँग्रेस लढेल. अकोला-बुलडाणा-वाशिमची जागा गेल्या वेळी राष्ट्रवादीने लढविली होती ती त्यांनाच पुन्हा हवी आहे. मात्र, काँग्रेसही या जागेचा आग्रह सोडायला तयार नाही. त्यामुळे या जागेबाबत पेच आहे. त्यावर सोमवारी दोन्ही पक्षांचे नेते पुन्हा बसून चर्चा करतील. राष्ट्रवादीने नागपूरची जागा घ्यावी आणि अकोल्यावरील दावा सोडावा, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. पण राष्ट्रवादीने हा प्रस्ताव अमान्य केला आहे. (विशेष प्रतिनिधी)
युतीचे ठरले, आघाडीचे अकोल्यावर अडले!
By admin | Published: December 07, 2015 2:14 AM