पुणे : ‘चैतन्याची थाप डफावर लागे, शाहिरी गर्जाया... दरी-दरीतून उठे मावळा’ हा रोमांच निर्माण करणारा पोवाडा, सर्वव्यापी ईश्वराची महती सांगणारा तुकारामांचा अभंग, कीर्तन आणि शौर्यासाठी स्फूर्ती देणारी शाहिरी असा भक्ती आणि शौर्याचा अनोखा मेळ शाहिरी व कीर्तनातून पुणेकरांना अनुभविण्यास मिळाला.नारद मंदिर येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्र शाहीर परंपरेचे अध्वर्यू शाहीर महर्षी र. द. दीक्षितगुरुजी (चिंचणी) व राष्ट्रीय कीर्तन परंपरेचे अध्वर्यू हभप गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित शाहिरी व कीर्तन महोत्सवाचे उद््घाटन रविवारी झाले. या वेळी ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शाहीर श्रीराम दाते, काशिनाथ दीक्षित, शाहीर हेमंतराजे मावळे, शुभांगी आफळे आदी उपस्थित होते. पराग ठाकूर म्हणाले, ‘‘भक्ती आणि शौर्य जिथे एकत्र येते तेथे महाराष्ट्राच्या मातीचे कर्तृत्व सुरू होते. सध्याची पिढी ही स्वैराचाराकडे झुकत आहे. ही पिढी स्वैराचाराकडे झुकवायची नसेल तर असे शाहिरी आणि कीर्तनाचे महोत्सव होणे गरजेचे आहे.’’महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे कीर्तन झाले. श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभेचे महोत्सवाला सहकार्य लाभले. शाहिरी कार्यक्रमास राजकुमार गायकवाड (ढोलकी), अभय नलगे (हार्मोनिअम), मुकुंद कोंडे (टाळ) यांनी साथसंगत केली. संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)
शाहिरी-कीर्तनातून शौर्य-भक्तीचा मेळ
By admin | Published: May 16, 2016 12:57 AM