मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानं पक्षाला धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार गुजरातच्या सूरत येथे हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. परंतु तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांना जबाबदारी दिली आहे.
त्यात आता बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिला आहे. संजय राऊत म्हणाले की, विधानसभेत वेळ येईल तेव्हा आकडे मोजा, आता घाई कशाला? सभागृहात पूर्ण बहुमत सिद्ध होईल. जे आमदार आज नाहीत त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर कारवाई होईल. त्यांची आमदारकी रद्द होईल. त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागेल. राजकीय अस्तित्व पणाला लागेल असं त्यांनी सांगितले.
तसेच आमदारांना परत यायचं आहे त्यांना येऊ दिले जात नाही. आमदारांवर दबाव आणला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ लक्ष घालावं. शिंदे भाजपासोबत होते तेव्हा त्यांच्यासोबत कुठली खाती होती. मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू आहे. मुंबईतले काही गुंड शिवसेनेच्या आमदारांच्या संरक्षणात बसले आहे. ज्यांच्यावर मुंबईत गुन्हे ते संरक्षणाला गेलेत. एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांनी प्रेमाने परत यावं. आम्ही स्वागत करतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
गटनेतेपदावरून काढलं का?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून संवाद झाला. या संवादात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो असं सांगितले. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढलं असं का केले? या संवादात एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढलं का? संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतायेत. भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतायेत. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलतायेत असा सवाल त्यांनी केला.
त्याचसोबत हिंदुत्वाच्या आधारे शिवसेना-भाजपा युती व्हावी हा आपला मुद्दा आहे. मी कुठलाही पक्षविरोधी कारवाई केली नाही तरी गटनेते पदावरून काढलं. काही नेते माझ्याशी फोनवर बोलतायेत. पण प्रसारमाध्यमांशी वेगळा संवाद का? शिवसेनेचे नेते माझ्याशी चर्चा करायला येत असतील तर इतर नेत्यांना याची कल्पना नाही का? जवळपास १५ मिनिटे हा संवाद झाला. लवकरच आपली भूमिका जाहीर करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.