- लोकमत न्यूज नेटवर्कबार्शी (जि. सोलापूर) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह १२५ जणांविरूद्ध मंगळवारी फौजदारी गुन्हा दाखल झाला. हे वृत्त समजताच शहरातील अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली. खबरदारी म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल १५ ते मार्च १६ या कालावधीत एक कोटी, पाच लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणात दिसून आले. या काळात सोपल हे बाजार समितीचे सभापती होते. त्यामुळे सोपल यांच्यासह उपसभापती, सचिव, संचालक मंडळ आणि कामगारांसह एकुण १२५ जणांवर बार्शी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांनी सांगितले की, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निधीचा अपहार, जमिनीतील वसूल भाड्यामध्ये अपहार, बाजार समितीत तसेच जमिनीवर अतिक्रमण, नियमबाह्य हंगामी व रोजगार भरती, चुकीच्या दिवशी व गैरहजर कालावधीत कर्मचारी यांना वेतन अदा करणे, तसेच शासकीय दस्तऐवजात बेकायदेशीर बदल करणे अशा प्रकारात एकूण एक कोटी पाच लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था सोलापूर) विष्णू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आ. दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल
By admin | Published: June 14, 2017 1:53 AM