मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत, त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासी भारतीयांनी त्यांचे उद्योग-व्यवसाय राज्यात सुरू करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आखाती देशातील अनिवासी मराठी भारतीयांना केले.आखाती देशातील अनिवासी मराठी भारतीयांच्या विविध संघटनांनी शरद पवार यांच्याशी ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे संवाद साधला. शिवाय येथील मराठी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भात शरद पवारांनी चर्चा केली.‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासी मराठी भारतीयांना लाभ मिळावा, यासह अन्य अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा झाली.अनिवासी मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ‘ईझ ऑफ डुईंग बिझिनेस’ अंतर्गत तत्काळ एकल परवाना (महापरवाना), जागेची सहज उपलब्धता, गुंतवणूक रकमेइतका परतावा, सूक्ष्म व लघू उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन योजनांची माहितीही पवारांनी त्यांना दिली. या सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पनेप्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचेही त्यांना सांगितले.अनिवासी भारतीयांच्या मुलांसाठी शाळांमध्ये राखीव जागा ठेवता येतील. सर्वांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही पवार यांनी त्यांना आश्वस्त केले.
महाराष्ट्रात उद्योगासाठी पुढे या; शरद पवारांचं अनिवासी भारतीयांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 4:14 AM