लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी, ७ मे रोजी होणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या आणि चर्चेतल्या मतदारसंघांत मतदान होणार असून मतदानासाठी गाव गाठण्यास चाकरमान्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे गावाकडेच मतदार यादीत नाव आहे. त्यामुळे अनेकांनी मतदानासाठी गावी जाण्याला प्राधान्य दिले असून शनिवारपासूनच सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. खासगी गाड्यांनाही त्यामुळे मागणी वाढली आहे.
परिणामी भाड्यात कृत्रिम वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. एरवी साताऱ्याला जाण्यासाठी साध्या खासगी गाड्या ५०० रुपये भाडे आकारतात. आता ते ८०० रुपये झाले आहे. तर कोल्हापूरसाठी हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत. सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील काही मतदारांनी तर बसचे ग्रुप बुकिंगही केल्याचे एका वाहतूकदाराने सांगितले.
अनेक गाड्यांमध्ये झाले आरक्षण सोमवारी कामावरून सुटल्यानंतर थेट गाव गाठण्याकडेही अनेक चाकरमान्यांचा कल आहे. त्यामुळे सोमवारी गावाकडे जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक गाड्यांमध्ये ९० टक्के प्रवाशांचे बुकिंग झाले आहे, अशी माहिती मुंबई बस मालक संघटनेचे उपाध्यक्ष मुराद नाईक यांनी दिली.