पा वसाळा सुरू होताच निसर्गप्रेमी पर्यटकांना वेध लागतात पावसाळी पर्यटनाचे. जिल्ह्यात महाबळेश्वर जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ. त्याचबरोबर पाचगणी, वाई, कोयनानगर आणि गेल्या काही वर्षात पर्यटक पसंती देत असलेले कास पठार. महाबळेश्वर-पाचगणी हे सह्याद्रीच्या उत्तुंग गिरिशिखरावर वसलेले पर्यटनस्थळ तीनही ऋतूंत आकर्षित करते. पावसाळ्यात धुक्याचे वातावरण आणि पावसाच्या सरी यामुळे पर्यटकांची पहिली पसंती महाबळेश्वरला असते.पावसाळ्यात पर्यटक आवर्जून भेट देतात लिंगमळा धबधब्याला. कड्यावरून कोसळणारे दुधासारखे शुभ्र पाणी पाहताना पर्यटक मुग्ध होतात. धुक्यात हरवलेल्या पायवाटेने धबधब्यापर्यंत जाताना वेगळाच रोमांच अनुभवास मिळतो. केट्स पॉर्इंट, मंकी पॉर्इंट, हत्तीचा माथा व येथूनच दिसणारे बलकवडी डॅमचे दृष्य पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मिनी काश्मिर म्हणून संबोधले जाणारे तापोळा पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने नटलेले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रतापगड किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत पावसाळ्यात वेगळाच अनुभव देतो. पाचगणी येथील जगप्रसिद्ध ‘टेबल लॅण्ड’ पाहण्यास पर्यटक पसंती देतात. पावसाळ्यात ढग जणू जमिनीवरच उतरले असावे असावा अनुभव टेबल लॅण्डवर मिळतो. पारशी पॉर्इंट, सिडनी पॉर्इंट येथून निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवास मिळतात.वाईमध्ये तुलनेने पाऊस कमी असतो. अशा वेळी बलकवडी धरणाला पर्यटक पसंती देतात. शिवकालीन किल्ले, लेणी, सातवाहन काळातील प्राचीन मंदिरे, सरोवर थाट, डोंगरदऱ्या असा हा सर्वगुणसंपन्न अशा नैसर्गिक सौंदर्याने व्यापलेला सातारा जिल्ह्यात पर्यटकांना कास आणि कोयना ही ठिकाणे पर्यटकांना खुणावत आहे. कास पठारावर फुलणारी विविध जातींची प्रदेशनिष्ठ फुले पाहण्यासाठी देशभरातून नव्हे तर विदेशातूनही पर्यटक येत असतात. कास पठारावर फुललेली विविधरंगी फुले, रिमझिम पाऊस, ऊनपावसाचा लपंडाव अनुभवण्यास आलेले पर्यटक निसर्गसृष्टी पाहून सर्व तणाव, थकवा विसरतात.- राहिल वारुणकर, महाबळेश्वर
चला पावसाळी पर्यटनाला...
By admin | Published: July 24, 2015 10:29 PM