मुंबई : भाजपा शिवसेनेत गेलेल्या मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिकडे जातानाची कारणे वेगळी होती, आता ते परत येण्यास उत्सुक आहेत, ही घरवापसी देशातच नाही तर राज्यातही होईल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. किती नेते परत येण्यास उत्सुक आहेत असे विचारले असता संख्या कशाला, लवकरच नावेही कळतील, असे उत्तर त्यांनी दिले.घरवापसीबद्दल बोलताना काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, दोन्ही काँग्रेसचे अनेक जण भाजपा शिवसेनेत गेले आहेत. ते जर तिकडे गेले नसते तर भाजपाने त्यांच्या जागी दुसरे नेतृत्व उभे केले असते. तसे झाले असते तर या नेत्यांच्या मतदारसंघात त्यांना स्पर्धक तयार झाले असते. ते होऊ नये म्हणून हे लोक त्या पक्षात गेले होते. परिणामी त्यांना त्यांचे मतदारसंघ शाबूत राखता आले. जे तिकडे गेले त्यांना भाजपाने आश्वासनांशिवाय चार वर्षांत काहीही दिले नाही. तरीही मतदारसंघ शाबूत रहावेत म्हणून हे नेते शांत बसून होते. आता निवडणुका जवळ येत आहेत. जर लोकसभेच्या निवडणुका आधी झाल्या तर खासदारकीसाठी भाजपा-शिवसेनेत गेलेले लोक आधी परत येतील आणि त्याच्या निकालानंतर विधानसभेच्या तोंडावर बाकीचे नेते परत येतील. शिवाय हे नेते भाजपात राहून आम्हालाच मदत करतील, असा गौप्यस्फोटही या वरिष्ठ नेत्याने केला.काही नेते त्यांच्यावरील चौकशीचा ससेमिरा वाचावा म्हणूनही भाजपामध्ये गेले होते. त्यात माजी मंत्री विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांचा समावेश होता. तर काहींनी प्रदेश काँग्रेसचे तत्कालिन प्रभारी मोहन प्रकाश यांनी नाराज केल्यामुळे पक्ष सोडला होता. त्यातले प्रमुख नाव म्हणजे पालघरचे खासदार राजेंद्र गावित. काँग्रेसचे विद्यमान प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी जे जे नाराज होऊन गेले त्यांची यादी करा, त्यांच्या जागी पर्यायी व्यक्ती मिळू शकते का ते शोधा पण त्याआधी नाराजांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी कृती कार्यक्रम बनवा, अशा सूचना दिल्याचे या वरिष्ठ नेत्याने सांगितले.पुन्हा नवा उत्साहगेली काही वर्षे राष्ट्रवादीतून कोणी जोरकसपणे भाजपाचा विरोध केला नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेतात हेच स्पष्ट होत नसल्याने आणि जर काही बोललो तर आपलाही भुजबळ होईल या भीतीपोटी अनेक नेते गप्प होते. पण कालच्या निकालाने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही उत्साह संचारल्याचे बुधवारी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आले.कमी लेखणे चुकीचेभाजपाला एवढ्या निकालावरुन कमी लेखणे चुकीचे ठरेल कारण भाजपाने बुथ पातळीवर प्रचंड काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २८८ मतदारसंघाचे सर्व्हे तयार आहेत. तेवढी तयारी आमच्याकडे किती जणांनी केली आहे माहिती नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्ट केले.
या, संधीसाधूंनो परत फिरा; काँग्रेस-राष्ट्रवादीची साद
By अतुल कुलकर्णी | Published: December 13, 2018 5:20 AM