डोंबिवली : निवडणुकीदरम्यान प्रचार करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँक्रिटच्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर मनसेला उद्देशून ‘आता बोलवा रस्त्यातील खड्ड्यांचे फोटो काढून प्रदर्शन भरवणाऱ्यांना आणि काढा आमच्या रस्त्यांचे फोटो’, ‘बघा किती चकाचक झाले आहेत रस्ते’ असे म्हटले होते. पण, आजही काही वेगळी परिस्थिती नाही. खड्डे आहे तसेच आहेत, असे खरमरीत पत्र मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे.मुळात आघाडी सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेमधून मिळालेल्या तीन हजार कोटींच्या निधीमुळे कल्याण-डोंबिवलीचे रस्ते काँक्रिटचे होत आहेत. आघाडी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील निष्क्रियतेमुळे सेनेने फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नगरसेवक विश्वनाथ राणे अधिक स्पष्टपणे सांगितले. कारण, ते नेहमी सभागृहात सेनेविरोधात पोटतिडकीने आघाडी सरकारची भूमिका मांडायचे. परंतु, कल्याण-डोंबिवलीतील भ्रष्ट व नियोजनशून्य कामामुळे रस्त्यांचे काम सहा वर्षे रखडत चालले आहे. ही गोष्ट तुम्हीही नाकारू शकत नाही, असा आरोप कदम यांनी केला. सहा वर्षांपूर्वी रात्री १२ वाजता मानपाडा रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ केला होता. नागरिकांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी आपण नेहमीच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करता. परंतु, येथील लोकप्रतिनिधींनी नागरिकांची उपेक्षाच केली आहे, हे तर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्वच अर्धवट प्रकल्पांमधून व रखडलेल्या रस्त्याच्या कामांमधून दिसून येते, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कंत्राटदारांच्या हितासाठी नाही तर नागरिकांच्या हितासाठी दिवसरात्र नाही, पण निदान दिवसातील काही वेळ देऊन चांगले रस्ते करायला सांगा. एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही नागरिकांच्या बाजूने बोलायचे नाही का? त्यांचा आवाज, त्यांचे दु:ख, त्यांच्या समस्या फोटोच्या माध्यमातून मांडायच्या नाहीत का? तुम्ही हीच गोष्ट सत्तेतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना ओरडून सांगा की, ‘काम असे करा की, मनसेने तुमच्या चांगल्या कामाचे फोटो प्रदर्शन भरवले पाहिजे’ मग आम्हीसुद्धा चांगल्या कामाला दाद देणारे व वेळेला चांगल्या कामासाठी मदत करणारे आहोत, असेही या पत्रात म्हटले आहे.
डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण येऊन बघा
By admin | Published: July 18, 2016 3:26 AM