सतीश सांगळे, कळस : शिक्षणाच्या प्रचार व प्रसारामुळे वाढलेली विज्ञाननिष्ठा आणि आधुनिक काळात घराघरात पोहोचलेली करमणूक व्यवस्था यामुळे नंदीकडून भविष्य कोणी ऐकत नाही. त्यामुळे नंदीवाले समाजाचा भविष्य सांगण्याचा परंपरागत व्यवसाय लोप पावत आहे. गावकुसाबाहेर भटकंती करणारा हा समाज आता स्थिर होत आहे. शेती, शेतमजुरी करून उदरनिर्वाह केला जात आहे. मात्र, गावगाड्यातून आजही सोयी-सुविधा-सवलती व घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, अशी खंत काझड (ता. इंदापूर) येथील नंदीवालेवस्तीमधील नागरिकांनी व्यक्त केली. या ठिकाणी सुमारे १५ कुटुंबे गेल्या ४० वर्षांपासून राहत आहेत. ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय’ हे गाणं महाराष्ट्राला सुपरिचित आहे. गाण्यातला भोलानाथ म्हणजेच नंदीवाल्यांचा नंदी. शिंगांना व पायात रंगीत सुती गोंडे बांधलेले, गळ्यात घंटांची माळ आणि पाठीवर रंगीबेरंगी व सुंदर नक्षीकाम केलेली शाल अशा सजवलेल्या वेशातला नंदी लक्ष वेधून घेतो. भविष्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलवून देतो, हे चित्र आपण अनेक वेळा अनुभवले आहे. नंदी शंकर महादेवाचा भक्त व सेवक असल्याची भावना असल्यामुळे लोकांच्या मनात नंदीवर श्रद्धा व त्याच्या भविष्यकथनाबद्दल आदर होता. याच श्रद्धा व आदरापोटी लोकांनी स्वखुशीने दिलेली दक्षिणा हेच नंदीवाल्या जमातींच्या उपजीविकेचे परंपरागत साधन होते. दिवाळी सण होताच नंदीवाले आपापला नंदी घेऊन खेळ दाखवायला राज्यात, राज्याबाहेरही जात असत. दिवाळीनंतर बाहेर पडल्यानंतर ते शिवरात्रीला परत येत होते. मात्र, सध्या या नंदीबैलाच्या खेळाचे आकर्षण घटले आहे.उपजीविकेचे साधन कमजोर झाले असून अभावग्रस्त आयुष्य जगावे लागत आहे. नंदीवाले जमात आंध्रातून दोन टप्प्यांत महाराष्ट्रात आली. या सर्वांची मातृभाषा तेलुगू आहे. यांना मराठी भाषा चांगल्या तऱ्हेने बोलता येतात. भटकेपणामुळे यांच्यात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असले तरी नवीन पिढीतील यांची बरीच मुले-मुली शाळा शिकत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वडापुरी येथे दर तीन वर्षांनी या सर्व नंदीवाले जमातीची मोठी यात्रा भरते. मुख्यत: घरोघर फिरून छोटे छोटे कृत्रिम शोभिवंत दागिने, अशुभ किंवा वाईट गोष्टींपासून मुला-बाळांचे संरक्षण करणारे ताईत, बैलाच्या गळ्यात बांधण्यासाठी आवश्यक कवड्यांच्या आणि मोठ्या मण्यांच्या माळा, सुया-दाभण-बिब्बा, फणी-कंगवे-रिबिन आदी कटलरी वस्तू विक्रीचे काम आजही करतात.>...आजही राहायला पक्के घर नाहीआमचा समाज साधारण १९७० मध्ये येथे आला. गावोगावी भटकंती करीत असताना येथे मूळ चार कुटुंबे स्थिर झाली. पवार व वाघमोडे आडनावे येथे आहेत. आता पंधरा कुटुंबे आहेत. मात्र, आजही १३ कुटुंबांना राहायला पक्के घर नाही. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. पारंपरिक व्यवसाय आम्ही करीत नाही. मात्र, महिला कटलरी व्यवसाय फिरून करतात, थोडी शेती आहे. त्यावर आम्ही उदरनिर्वाह करीत आहे, अशी व्यथा गणेश पवार याने मांडली.
सोयी-सुविधा-सवलतींपासून नंदीवाले समाज दूरच
By admin | Published: October 31, 2016 1:22 AM