ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आणखी पाच देशांमध्ये सापडला आहे. यामुळे केंद्र सरकारने युनायटेड किंग्डममधून येणारी विमाने बंद केली आहेत. आज मुंबईत पाच विमाने येणार आहेत. या प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने क्वारंटाईन गाईडलाईन जारी केल्या आहेत.
ब्रिटनमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू केला आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावर मुंबई महापालिकेने राज्यातील इतर विभागांवर जबाबदारी न टाकता लंडनहून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईतच क्वारंटाईन करण्याची सोय केली आहे. या प्रवाशांसाठी फाईव्हस्टार हॉटेल बुक करण्यात आली असून या हॉटेलचा खर्च या प्रवाशांनाच करायचा आहे. तसेच त्यांना विमानतळावर उतरल्य़ावर पसंतीनुसार हॉटेल निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. याचबरोबर हे प्रवासी आल्या आल्या त्यांची कोणतीही कोरोना टेस्ट केली जाणार नाही. तर ५ ते ७ दिवसांनी हॉटेलमध्येच त्याची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टचा खर्चही या प्रवाशांनीच करायचा आहे.
या आरटी-पीसीआर टेस्टमध्ये प्रवासी पॉझिटिव्ह आला आणि त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसल्यास आणखी ७ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशाप्रकारे १४ दिवसांचे हॉटेलचे बिल या प्रवाशाला भरावे लागणार आहे. तसेच जर त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तर त्याला घरी सक्तीचे क्वारंटाईन केले जाणार आहे. जर प्रवाशामध्ये विमानतळावर आल्यावर कोरोनाची लक्षणे दिसली तर त्याला थेट सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे.
क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी एक हजार खोल्या पंचतारांकित आणि फोर स्टार हाॅटेलमधील तर एक हजार खोल्या बजेट हाॅटेल्समधील असणार आहेत. तसेच बुधवारपासून युरोप खंडातील इतर देशांमधून तसेच मध्य पूर्व आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना महापालिकेच्या केंद्रांमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
इतर विदेशी प्रवाशी होणार येथे क्वारंटाईन...अमेरिकेसह, दक्षिण मध्य आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर तसे शिक्केही मारण्यात येतील. तसेच युरोप खंडातील इतर देशांमधून तसेच मध्य पूर्व आशिया खंडातील देशांमधून आलेल्या प्रवाशांमध्ये लक्षण असल्यास त्यांना फोर्ट येथील जी.टी.रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.