सत्तेची किमया ! रिकाम्या खुर्च्यांनी त्रस्त काँग्रेसच्या स्थानिक कार्यक्रमांना वाढतेय गर्दी
By रवींद्र देशमुख | Published: March 9, 2020 11:12 AM2020-03-09T11:12:31+5:302020-03-09T11:14:04+5:30
सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय आणि काँग्रेसची झालेली पिछेहाट यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या संघटनाला मोठा धक्का बसला होता. सत्ता काळात काँग्रेसकडून देखील केडरवर दुर्लक्ष झालं होतच. त्यामुळे सत्ता जाताच काँग्रेसला घरघर लागली. महाराष्ट्रातूनही 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यामुळे काँग्रेसकडे कार्यकर्त्यांना वणवण भासली होती. मात्र 2019 मध्ये राज्यात सत्ता येताच काँग्रेसचे संघटन पुन्हा मजबूत होण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी गर्दी जमत नसल्याने काँग्रेसनेते हैराण झाले होते. त्याचवेळी सत्ताधारी भाजप प्रचार सभांच्या गर्दीचा उच्चांक तयार करत होते. हा फरक सत्तेचा होता हे स्पष्टच होते. गर्दी जमत नसल्यामुळे भाजपकडूनही काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे अनेक काँग्रसनेते कार्यक्रम घेण्यास धजावत नव्हते. कार्यक्रम घेतला तरी निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चित्र बदलताना दिसत आहे.
विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसनेते नाना पटोले यांचा नुकताच जालना शहरात जाहीर सत्कार करण्यात आला. येथील एका सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हे सभागृह गर्दीने भरेल का, अशी शंका विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनाच होती. खुद्द गोरंट्याल यांनीच तशी शंका उपस्थित होती. त्याचे कारण म्हणजे, निवडणूक प्रचारातील अनुभव त्यांना होता. मात्र जालना येथील सभागृह भरले होते. अर्थात ही सत्तेची किमया आहे, हे वेगळं सांगायला नको. मात्र या सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे.