मुंबई- शिवसेना ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी होती. जेव्हापासून आपण सत्ता हाती घेतली आहे त्यापासून आपण १०० टक्के समाजकारण केले आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, आपण आपली वचने पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे.पाच दशके आपण जशी लोकांची सेवा केली, तशी पुढेही आपल्याला सेवा करायची आहे. गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचे आहे. 'प्रथम ती' असा कार्यक्रम आपण हाती घेतला होता. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यात आपली शिवसेनेची शाखा असायला पाहिजे आणि त्या शाखेचा आवाज बुलंद करायचा हा प्रयत्न आपला असायला पाहिजे, असा मानसही आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला आहे.
तत्पूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शिवसेना हेच एक वादळ आहे आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचकसुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढले आहे. त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. हिमालयाच्या संकटाला सुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक असतो. आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे.शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही, असंही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही. कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो. शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या त्या आता आपण १०० लॅब केले आहेत आणि आपण लॅब आणखीन वाढवणार आहोत.
हेही वाचा
चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला देणार दिलासा; GSPचा दर्जा पुन्हा मिळणार?
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे होणार वितरण, प्रथम विजेत्यास ५ लाख मिळणार
राहुल गांधींचा वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा गरजूंना मदतीचा हात
Unlock 1.0: राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात