सचिन कांकरिया - नारायणगाव : प्रशासकीय पातळीवर दररोज कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे व्हाट्सअप , फेसबुक वर आलेले मेसेज , तक्रारी व अन्य समस्याचे निवारण करायचे. उर्वरित वेळ पत्नी डॉ. आश्विनी , मुलगी अद्या , मुलगा रुद्र यांना देत डॉ. कोल्हे एक पुस्तक लिहित आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास उलगडणारे हे पुस्तक आहे.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आहेत. मात्र, तरीही त्यांचा दिनक्रम व्यस्त आहे. रोज सकाळी त्यांचे तीन महत्त्वाचे अपडेट असतात. पहिला कॉल जिल्हाधिकारी नवल किशोर राम , नंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि तिसरा कॉल पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा असतो. या तीन प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोरोना बद्दल अपडेट घेऊन शिरूर मतदारसंघातील परिस्थिती काय आहे ? हे जाणून घेतात. यानंतर मतदारसंघातून आलेले मेसेज कॉल , व्हाट्सअप , फेसबुक वरील सूचना तक्रारीची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतात. स्वत: डॉक्टर असल्याने कोरोनासंदर्भात नागरिकांच्या शंकांचे निरसनही ते करतात. सध्याच्या घडामोडी असेल असा दररोज एक व्हिडिओ आज पासून यूट्यूब व फेसबुक द्वारे नागरिकां पर्यंत पाठविण्याचा त्यांचा मानस असल्याने डॉ. कोल्हे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. कोल्हे यांचा दिनक्रम व्यस्त होता. संभाजी महाराज वरील मालिका , चित्रपट नंतर लोकसभा निवडणूक या सर्व व्यस्त कालावधीमध्ये गेल्या ५ ते ६ वर्षात त्यांना त्यांच्या कुटुंबाला जास्त वेळ देता आला नाही . आता घरात असताना बराच वेळ ते त्यांची पत्नी डॉ. आश्विनी , मुलगी अद्या , मुलगा रुद्र यांच्या सोबत घालवितात . अद्या , रुद्र यांच्या सोबत खूप धमालमस्ती करीत आहेत
इतिहास एका स्वप्नपूर्तीचा - ' स्वराज्यरक्षक संभाजी' पुस्तकाचे लेखन....
दिवसभरातील काही वेळ स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा प्रवास उलगडून दाखवणारे पुस्तक डॉ. अमोल कोल्हे लिहित आहेत. या पुस्तकामध्ये मालिकेसाठी आलेल्या अडचणींसोबतच डॉ. कोल्हे यांनी केलेला संभाजी महाराजांचा अभ्यासही असेल. त्याचबरोबर सेटवरील गमती-जमती असतील. त्याचबरोबर इतिहासातील काळ उभा करण्यासाठी अनेकांनी केलेली मदतीचाही उल्लेख असेल.