संदीप बोडवेमालवण (जि. सिंधुदुर्ग) : भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून मराठी अधिकारी असलेल्या प्रेरणा देवस्थळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी तारकर्ली येथे रिअर ॲडमिरल प्रवीण नायर (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लिट) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शुक्रवारी भारतीय नौदलप्रमुख ॲडमिरल हरी कुमार यांनी तिचे नाव जाहीर न करता ही घोषणा केली होती.
ऑफिसरपदी मराठी व्यक्ती
देवस्थळी या मूळच्या मुंबई इथल्या असून, त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या २००९मध्ये भारतीय नौदलात रुजू झाल्या. त्यांचा भाऊदेखील भारतीय नौदलाचा अधिकारी आहे. त्यांचे लग्न नौदल अधिकाऱ्याशी झाले असून, त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे.
आयएनएस त्रिंकट हे भारतीय नौदलाचे जलद हल्ला करणारे क्राफ्ट आहे आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील त्रिंकट बेटावरून त्याचे नाव देण्यात आले आहे. नौदलाने आपली सेवा नैतिकता आणि मूल्ये जपत सर्व श्रेणींमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन दिले आहे.
युद्धनौकेचे नेतृत्व : नौदलात युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या देवस्थळी या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. नौदलातील महिला कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या व श्रेणी देण्याच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.