नागपूर - कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. या आजाराला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘अॅम्फोटेरेसिन बी’ या इंजेक्शनचे उत्पादन आता वर्धा येथे सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी उत्पादन सुरू करून आम्ही त्यांना एकप्रकारे ही भेटच दिली आहे, असे गुरुवारी कंपनीतर्फे सांगण्यात आले. सोमवार (दि. ३१) पासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे.‘अॅम्फोटेरेसिन बी’ या इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता, वर्ध्यात याचे उत्पादन व्हावे, या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती. १४ मे रोजी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला ‘अॅम्फोटेरेसिन बी’च्या निर्मितीची मंजुरी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून मिळाली. त्यानंतर कंपनीने या इंजेक्शनची निर्मिती सुरू केली आहे.
...तर दररोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादनकच्चा माल उपलब्ध झाल्यास दररोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादन ही कंपनी करणार आहे. तसेच हे इंजेक्शन कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या इंजेक्शनचे उत्पादन वर्धा येथे होणे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरणारी बाब आहे. कच्चा माल उपलब्ध झाला, तर या इंजेक्शनची निर्मिती वाढेल आणि तुटवडा जाणवणार नाही, असे जेनेटिक लाईफ सायन्सेसचे डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.