ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - फक्त प्रसिद्धीसाठी काही नेते शाहरूखला लक्ष्य करून त्याच्यावर टीका करत आहेत, शाहरुख हा देशाचा अभिमान असून त्याच्यावर अशी टीका करणं चुकीचं आहे अशा शब्दांत शाहरूखची पाठराखण करत भाजपा खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भाजपा नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. शाहरूखला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केलं.
देशात धार्मिक असहिष्णूता वाढत आहे, असे मत बॉलिवूडचा बादशाह शाहरूखने व्यक्त केले होत. शाहरूखच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान शाहरूखने असहिष्णुतेमुळे आपली अंधःकाराकडे वाटचाल होण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर वाद उफाळला आणि भाजपा नेत्यांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलं. शाहरूख हा देशद्रोही असून तो भारतात राहत असला तरी त्याचे मन मात्र पाकिस्तनातच आहे, अशी टीका भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केले होते. तर शाहरुख पाकिस्तानचा एजंट असल्याचा आरोप करत त्याला पाकिस्तानलाचे पाठवणं योग्य ठरेल असे टीकास्त्र साध्वी प्राची यांनी सोडले. भाजपाचे आणखी एक नेते खासदार योगी आदित्यनाथ यांनी शाहरूखची तुलना पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईद याच्याशी केली.
या सर्व वादानंतर आणखी तेल ओतत दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदने शाहरूखला पाकिस्तानमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. शाहरुख खान याच्याप्रमाणे भारतात मुस्लिम नागरिकांना केवळ आपल्या धर्मामुळे अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी भारत सोडून पाकिस्तानमध्ये यावे, असे सईदने म्हटले. भाजपा नेत्यांनी शाहरुखवर केलेल्या टीकेची दखल घेत हाफिजने टिष्ट्वटरवरून हे निमंत्रण दिले. ‘कला, क्रीडा व संस्कृती क्षेत्रात जगभरात आपले नाव कमावणाऱ्या भारतीय मुस्लिमांना आपली ओळख टिकविण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे. या भारतीय मुस्लिमांमध्ये शाहरुख खानही आहे. त्याला आपल्या धर्मामुळे भेदभाव सहन करावा लागत असेल, तर त्याने पाकमध्ये यावे, असे त्याने म्हटले.