पुणे : स्मार्ट सिटी योजनेला महापालिकेत राजकीय विरोध सुरू झाला आहे. या योजनेला सध्या तरी केवळ भाजपचा स्पष्ट पाठिंबा दिसत आहे. अन्य पक्षांचे तळ्यात-मळ्यात धोरण असल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या योजनेला मनसेचा पाठिंबा मिळविण्यासाठी थेट कृष्णकुंज गाठले.स्मार्ट सिटीचा प्रस्ताव बुधवारी महापालिकेच्या खास सभेत मान्यतेसाठी येणार आहे. तत्पूर्वीच आयुक्तांनी राज ठाकरे यांच्यासमोर आराखडा सादर करून त्यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेस सत्तेत आहेत. या दोन्ही पक्षांनी या योजनेच्या आर्थिक तरतुदीवरून नाराजी नोंदविलेली आहे. मोठा गाजावाजा केलेल्या या योजनेसाठी केवळ शंभर कोटी रुपये दिले जाणार असल्याचे या पक्षांचे म्हणणे आहे. या योजनेमुळे महापालिकेची स्वायतत्ता टिकणार नाही, अशी शिवसेनेचीही नाराजी आहे. त्यामुळे सभेत योजनेचा प्रस्ताव मंजूर होणार की नाही, असाच प्रश्न आहे. आयुक्तांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर सूचक मौन बाळगले आहे. (प्रतिनिधी)> राज ठाकरे यांनी महापालिकेच्या उपक्रमांचे तसेच पालिकेच्या आराखड्याचे कौतुक केले असले, तरी योजनेला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. योजनेला अवघा १०० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापेक्षा महापालिकेचे अंदाजपत्रक मोठे आहे. त्यामुळे या योजनेचा शहराला फायदा होणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.
स्मार्ट पुण्यासाठी आयुक्त ‘कृष्णकुंज’वर
By admin | Published: December 09, 2015 1:27 AM