मुंबई : समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट दिली. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, तसेच ‘त्रिशरण पंचशील’ प्रार्थनाही केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘राज्यातील शोषित, पीडित यांचा विकास करून समाजातील शेवटच्या वर्गातील व्यक्तीचा विकास करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. त्यासाठी समतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करू या,’ असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्तूपावर राज्य शासनाच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पणडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाचे आणि फेसबुक पेजचे लोकार्पण करण्यात आले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर पार पडलेल्या या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘संकेतस्थळ आणि फेसबुक पेजमुळे सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला आहे. संविधानातील हा संदेश आणि एकात्मतेच्या बळावरच राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठी कटिबद्ध!
By admin | Published: December 07, 2015 2:06 AM