नागपूर: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सध्या विरोधकांचा गदारोळ सुरू आहे. मात्र आम्हाला आमच्या आश्वासनांची आठवण करुन देऊ नका. आम्हाला स्मृतीभ्रंश झालेला नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज भाजपाला लक्ष्य केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आम्ही वचनबद्ध आहोत, असं म्हणत त्यांनी कर्जमाफीचे संकेत दिले. नागपूरमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. सत्ता आल्यामुळे बदलू नका. आधीच्या सरकारसारखे वागू नका, असा सल्ला उपस्थितांना देत उद्धव ठाकरेंनीभाजपावर निशाणा साधला. आम्हाला आम्ही दिलेली वचनं माहीत आहेत. आमचेच शब्द आमच्यावर फेकू नका. आम्हाला स्मृतीभ्रंश झालेला नाही. पण अच्छे दिन कधी येणार याबद्दल विचारताच बोबडी का वळली होती, असा सवाल ठाकरेंनी विचारला. नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५० दिवसांची मुदत मागितली होती. त्याचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी मोदींवरही शरसंधान साधलं. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपालादेखील मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेची ओळख ठाम आहे. आम्ही कधीही बुरखा घातला नाही. आम्ही हिंदुत्ववादीचं आहोत आणि हिंदुत्ववादीच राहू. युती तुटली म्हणून आम्ही धर्मांतर केलेलं नाही. तुम्ही २०१४ मध्ये युती तोडलीत तेव्हादेखील आम्ही हिंदुत्ववादीच होतो, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी भाजपाला करुन दिली. भाजपा आमदारांनी आज विधानसभेत 'मी पण सावरकर' अशी घोषणा असलेल्या टोप्या घालून प्रवेश करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरही उद्धव यांनी भाष्य केलं. अखंड हिंदुस्तान हे सावरकरांचं स्वप्न होतं. त्याचं काय झालं, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान करतात. म्हणजे सरकारला विरोध करणारे सगळे देशद्रोही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंमत असेल तर पाकिस्तानला संपवा. तुमचं धाडस तिथे दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.
'त्या'बद्दल मी आजही वचनबद्ध; उद्धव ठाकरेंकडून मोठ्या निर्णयाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 8:09 PM