मुंबई : विकास आराखड्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महापालिका मुख्यालय स्तरावर एका चमूचे गठन करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. तसेच या चमूला मदत करण्यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावरही यंत्रणा उभी करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे.महापालिकेच्या ‘विकास आराखडा २०३४’ च्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी कशी केली जावी? याची रुपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने आयुक्त अजय मेहता यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली. या बैठकीत विशेष कार्य अधिकारी (विकास आराखडा पुनर्रचना) रमानाथ झा यांनी आयुक्तांसमोर या रुपरेषेबाबत संगणकीय सादरीकरण केले. यावेळी विकास आरखड्याच्या महापालिका मुख्यालय स्तरावरील अंमलबजावणीचा मुद्दा मांडण्यत आला.त्यानुसार, विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित असणारी कामे करण्यासाठी प्रत्येकी पाच वर्षांच्या चार योजना तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. प्रत्येक पंचवार्षिक योजना ही प्रत्येकी एक वर्षाच्या पाच वार्षिक योजनांमध्ये विभाजित करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावणी ही एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात करण्याचे अंदाजित आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार प्रत्येक वार्षिक योजनेसाठी तरतूद करावयाची अंदाजित रक्कम ही ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नसावी, असे प्रस्तावित करण्यात येणार आहे. वार्षिक योजनेमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या ज्या बाबींची अंमलबजावणी संबंधित वर्षात होणार नाही, त्या बाबींचा समावेश त्या पुढील वार्षिक योजनेमध्ये करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘डीपी’साठी समिती स्थापन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2016 2:07 AM