मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्यावर मतैक्य घडविण्यासाठी सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांशी चर्चा करून आराखडा अंतिम करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. तसेच, येत्या १४ एप्रिलनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी अद्याप इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे स्मारकाच्या बांधकामात प्रगती होत नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथील स्मारकाच्या उभारणीसाठी सर्व आवश्यक परवानग्या केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत.स्मारकाच्या सध्याच्या आराखड्यावर काही जणांनी आक्षेप घेतले आहेत. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत कोणताच वाद राहू नये, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आराखड्याबाबत सर्वांचे मतैक्य घडविण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. स्मारकाच्या विकासासाठी शासनाने यापूर्वीच एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार एमएमआरडीएने स्मारकासाठी १२५ कोटींची तरतूद आपल्या अर्थसंकल्पात केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तपशील लवकरच जाहीर करूस्मारक कधीपर्यंत होणार, असा प्रश्न भाई गिरकर यांनी विचारला तर व्यवस्थापनासाठी सरकारने कोणती व्यवस्था केली आहे का, असा प्रश्न हेमंत टकले यांनी विचारला. यावर, स्मारकाच्या व्यवस्थापनासाठी प्राधिकरण स्थापण्याचा सरकारचा विचार आहे. आराखडा निश्चित झाल्यानंतर तपशील जाहीर करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
इंदू मिल स्मारकासाठी समिती
By admin | Published: March 25, 2016 2:41 AM