मुंबई : राज्याच्या प्रगतीसाठी अभिनव विकासाच्या योजना आखणे आवश्यक आहे. विविध उपक्रम राबवून प्रगतिपथावर जाण्यासाठी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार, २६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयआयटी पवई कॅम्पसमध्ये होणार आहे. मूड इंडिगो फेस्टिव्हलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्याच्या विकासात तरुणांची भूमिका, तरुण पिढीच्या सशक्तीकरणासाठी सरकारचे प्रयत्न आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे बदलणारी सामाजिक परिस्थिती, याविषयी ते तरुणांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमात राज्यातील मुख्य ११ समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मतांनुसार, राज्यातील विकासाची योजना बनविण्यात येणार आहे. राज्यातील ५०० महाविद्यालयांतील २ लाख विद्यार्थी मुख्यमंत्र्यांसह या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, तसेच राज्यातील १ कोटी तरुणांपैकी जवळपास ४० टक्के तरुण आॅनलाइनच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. तरुणांना २०२५पर्यंतच्या प्रगतिशील महाराष्ट्राच्या विकासाचे प्रारूप बनविण्याची विशेष संधी या कार्यक्रमांतर्गत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)युवा वर्गाला २०२५ पर्यंतच्या प्रगतीशील महाराष्ट्राच्या विकासाचे प्रारूप बनविण्याची विशेष संधी म्हणजे, ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रम आहे. कार्यक्रमामध्ये राज्यातील ३ हजार ५०० विद्यार्थ्यांसोबत राज्यातील विकासाविषयी मुख्यमंत्री चर्चा करतील. राज्यातील ३५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या १६ ते ३५ वयोगटातील आहे. राज्याच्या विकासासाठी तरुणांच्या मनात अनेक विचार आहेत, त्यांची स्वप्ने आहेत. या विषयावर चर्चा करण्यात येणार असून, त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
By admin | Published: December 26, 2016 5:00 AM