मुंबई : एसटीच्या कर्मचाऱ्यांना नवा गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, हा गणवेश पुरवण्यासाठी नामवंत कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात सोमवारी एसटीच्या मुख्यालयात बैठक झाली आणि यात नामवंत कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. गणवेशासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत जानेवारी महिन्याच्या अखेरीस असून, ती वाढविण्याची विनंती अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. केंद्राच्या एनआयएफडीकडून (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फॅशन डिझाइन) एसटीच्या कामगार वर्गासाठी गणवेशाचे डिझाइन तयार केले जात होते. यावर २0१६ मध्ये अनेक बैठका झाल्या. अखेर एनआयएफटीकडून सप्टेंबर २0१६ मध्ये खारघर येथील कार्यालयात गणवेशाच्या डिझाइनचे अंतिम सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी एसटीचे अधिकारी व युनियनचे पदाधिकारीही उपस्थित होते. सगळ्या युनियन आणि कामगार वर्गाशी चर्चा करून गणवेशाच्या डिझाइनला अंतिम मंजुरी देण्यात आली होती. चालक वाहकांसाठी खाकी रंगाचा गणवेश असतानाच, त्यावर एसटीचा लोगो आणि त्यांचे नाव असेल. यांत्रिकी विभागातील कामगारांसाठीही गडद निळा आणि करड्या रंगाचा नवीन गणवेश असणार आहे. (प्रतिनिधी)
नव्या पोशाखासाठी कंपन्या सरसावल्या
By admin | Published: January 17, 2017 6:12 AM