राम शिनगारे औरंगाबाद : राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांनी २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले असून स्वायत्त विद्यापीठातील कार्यक्रमांसाठी इव्हेंट कंपन्यांची निवडही स्वत:च केली आहे. थोपवलेल्या इव्हेंट कंपन्यांचे कार्यक्रम राबवणे आणि त्यांना लाखो रुपये अदा करणे विद्यापीठांवर बंधनकारक केल्याची माहिती समोर आली आहे.उच्चशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या स्वाक्षरीने २० जानेवारीला सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कार्यक्रम साजरा करण्याची नियमावलीही त्यात आहे. विविध इव्हेंट कंपन्या निर्मित कार्यक्रम विद्यापीठांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी निविदाही मागविलेल्या नाहीत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दीपक मंडळ, नाशिकनिर्मित कंपनीचा ‘बोलतो मराठी’ कार्यक्रम ठेवला. त्यासाठी विद्यापीठ तब्बल १३ लाख रुपये खर्च करीत असल्याचे वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी यांनी सांगितले. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ प्रशासनाने उच्चशिक्षण विभागाची सूचना धुडकावत ५ लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित निधीत उपलब्ध होणाºया कंपनीला कार्यक्रम दिला आहे. हा नवीन विद्यापीठ कायद्याचा भंग असल्याचे जाणकारांनी ‘लोकमत’ला सांगितले.विद्यापीठ स्वायत्त संस्था असतानाही मंत्र्यांच्या आदेशामुळे इव्हेंट कंपन्यांना लाखो रुपये द्यावे लागत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले. याविषयी एकाही कुलगुरूंनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला. उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी प्रतिसाद दिला नाही.कंपन्यांची सक्ती-स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात श्री जी.आर. इमेजेस, नागपूरनिर्मित ‘कस्तुरीगंधित माय मराठी’, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अंबा फेस्टिव्हल ट्रस्ट, अमरावतीनिर्मित ‘मायमराठी’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरभी, पुणेनिर्मित ‘बोलू कवतिके’, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लक्ष्मीकांत धोंडनिर्मित ‘वाणी अमृताची’, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नकाशे इंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मराठी आमची मायबोली’, शिवाजी विद्यापीठात अॅडफिज कंपनीनिर्मित ‘मराठीची शिदोरी’, सोलापूर विद्यापीठात निश इंटरटेनमेंट प्रस्तुत ‘ज्ञानभाषा माय मराठी’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सलील कुलकर्णी, पुणे प्रस्तुत ‘कवितेचं गाणं होताना’, गडचिरोली येथील विद्यापीठात रागरंग, अमरावतीनिर्मित ‘माझा मराठीची बोलू’ आणि मुंबई विद्यापीठात मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठान प्रस्तुत ‘मराठी नामा’ हे कार्यक्रम सादर होणार आहेत.
मराठी भाषा दिनासाठी इव्हेंट कंपन्यांचे ‘मॅनेज’मेंट, उच्चशिक्षण विभागानेच ठरविल्या कंपन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 2:46 AM