मुंबई - जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. संघाची लष्कराशी तुलना म्हणजे भागवत यांनी थंडीच्या दिवसांमध्ये पाहिलेले उबदार स्वप्न असून, भागवत आणि संघ स्वयंसेवकांना नियंत्रण रेषेवर पाठवले तर त्यांच्याकडील दंडुका आणि बौद्धिक घेणारी पुस्तके पाहून पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी पसार होतील, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांनी जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघ तीन दिवसांत करेल, असा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय लष्करासोबक तुलना केली होती. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आजच्या व्यंगचित्रासाठी तोच विषय निवडून राज ठाकरे यांनी संघ आणि सरसंघचालकांचा समाचार घेतला. या व्यंगचित्रामध्ये सरसंघचालक मोहन भागवत हे झोपेत स्वप्न पाहत असून, त्यात ते सीमेवर दंडुका घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना दरडावताना दाखवले आहे. " क्या है रे इकडे, चलो पलिकडे, दंडुका देखा नही क्या हमारा, एक एक को पुस्तक फेक फेक के मरेगा, समजलं क्या?" असे भागवत म्हणत असून, त्यांचा तो आवेश पाहून पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी भागो भागवत आया, असे ओरडत पळताना दिसत आहेत. दरम्यान, याआधीच्या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांचा समाचार घेतला होता. या व्यंगचित्रात अहो, कधी तरी आमच्याही छकुल्याचं कौतुक करा ना, असा मोदी मनमोहन सिंगांना सांगताना दाखवण्यात आले होते. त्यावर मनमोहन सिंगांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजी, नक्की केले असते पण त्यात नुसताच पेंढा भरलाय, असं उत्तर मनमोहन सिंग यांनी दिलं आहे. व्यंगचित्रातून मोदी हातातून बाबागाडी घेऊन जात असताना पेंढ्याच्या स्वरूपात एक प्रतीकात्मक बाहुलं दाखवण्यात आलं आहे. त्या पेंढ्यानं भरलेल्या योजनारूपी बाहुल्याला जाहिरातबाजीचं विशेषण लावण्यात आलं आहे. तर मोदींच्या मागे अमित शाह खेळणी घेऊन चालताना दाखवण्यात आले आहेत.