मुंबई : निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकऱ्याना मदत देण्यात अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. याबाबत लवकरच परवानगी मिळेल. त्यामुळे पुढील आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे मिळायला सुरूवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.राज्यात विधानपरिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवनागी मिळेल. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खातात पैसे वळते व्हायला सुरुवात होईल. अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या रक्कमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.राज्यातील मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करून मंदिरांबाबत दिवाळीनंतरच निर्णय होईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
दिवाळीपूर्वीच मिळणार नुकसान भरपाई, शेतकऱ्यांचा सण आता गोड होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 2:52 AM