पुणे : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी - २०१६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळविले आहेत. राज्यात मेडिकल अभ्यासक्रमाची ४८ शासकीय महाविद्यालये असून त्यात एमबीबीएसच्या ६ हजार २४५ जागा आहेत. त्यामुळे मेडिकलच्या जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चांगलीच चढाओढ होणार आहे.देशात एकूण ४१२ वैद्यकीय महाविद्यालये असून त्यात ५२ हजार ९६५ जागा आहेत. देशासह राज्यातील खासगी व अभिमत विद्यापीठातील मेडिकलचे प्रवेश नीट परीक्षेच्या गुणांच्या आधारेच होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या सीईटी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाच यंदा मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे. एकूण उपलब्ध जागा आणि सीईटीचा निकाल विचारात घेता सीईटी परीक्षेत २०० ते १७७ पर्यंत गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाच एमबीबीएसला प्रवेश मिळेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.राज्यात मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन विभाग करण्यात आले आहेत. उर्वरित महाराष्ट्रासाठी १ हजार ५१० जागा असून विदर्भासाठी ८००आणि मराठवाड्यासाठी ५०० जागा आहेत. मात्र, त्यातील १५ टक्के जागा राष्ट्रीयस्तरावरील प्रवेशासाठी असतील.
मेडिकल प्रवेशासाठी स्पर्धा वाढली
By admin | Published: June 02, 2016 12:51 AM