मुंबई : एखाद्या घडलेल्या गुन्ह्यात तपासाअंती न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटची (दोषारोपपत्र) माहिती तक्रारदाराला देण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहे. न्यायालयात चार्जशीट दाखल होताच त्याच्या माहितीचा तपशील यापुढे तक्रारदाराला ई-मेलद्वारे मिळणार आहे.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ९० दिवसांच्या आत तपासाअंती त्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले जाते. दरम्यान या दोषारोपपत्राचा तपशील फक्त आरोपींना दिला जातो. तक्रारदारांना मात्र ही चार्जशीट मिळविताना बराच खटाटोप करावा लागत होता.अखेर तक्रारदारांनाही याबाबत माहिती मिळणे सोयीस्कर व्हावे, यासाठी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी या माहितीचा तपशील तक्रारदारांना मेल अथवा एसएमएसद्वारे देण्याचे आदेश पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहे. त्यामुळे दोषारोप पत्रातील गुन्ह्यांची कलमे, दोषारोपपत्र क्रमांक, दोषारोपपत्र दाखल तारीख आणि न्यायालयातील तारखेबाबतच्या माहितीचा यामध्ये समावेश आहे. या आधारे तक्रारदारांना गुन्ह्याचा तपास, पुरावे याबाबतचा पाठपुरावा करणे सोयीस्कर ठरणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली. (प्रतिनिधी)
तक्रारदाराला चार्जशीटची कॉपी ई-मेलद्वारे मिळणार
By admin | Published: January 30, 2016 1:12 AM